बृहन्मुंबई पोलीस वाद्यवृंद पथक

About Us


जगातील संपुर्ण ब्रिटिश साम्राज्यामध्ये सन १९३५ हे वर्ष ′रजत जयंती वर्ष′ म्हणुन साजरे करण्यात आले. भारतामध्येही या निमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या रजत जयंती वर्षाच्या निमित्ताने नायगांव पोलीस कवायत मैदानावर ३ डिसेंबर १९३५ रोजी एका शानदार संचालनाचे आयोजन करून नेहमीच्या प्रथेप्रमाणे सर्व प्रतिष्ठितांना आणि जनतेला निमंत्रित करण्यात आले होते. गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी मानवंदना स्वीकारली. मुंबई पोलीसांच्या उत्कृष्ठ संचालनाने सर्वांची मने जिंकली असली तरी एक बाब मात्र प्रतिष्ठितांना खटकत होती, ती म्हणजे या संचालनासाठी मुंबई पोलीसांचे स्वतःचे वाद्यवृंद अस्तित्वात नव्हते.

नायगांव पोलीस मुख्यालयाची शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजेच अभियांत्रिकी दृष्टीने केलेली रचना आदर्शवत समजले जाणारे मैदान, आकर्षक असणारे पोलीस संचालन इत्यादी सर्व बाबी उत्कृष्ठ असल्या तरी, जोपर्यंत या पोलीस दलाकडे वाद्यवृंद (बँड पथक) उपलब्ध होत नाही, तोपर्यंत परेडचे परिपुर्णता झाल्याचे समाधान नाही; असा एक विचार तेथील उपस्थित प्रतिष्ठित मान्यवरांकडे चर्चेला आला. सरकारच्या काटकसरी आर्थिक धोरणामुळे पोलीस वाद्यवृंदावर एव्हढा खर्च करणे, सध्यातरी शक्य नव्हते. या विचारातून उत्स्फूर्तपणे प्रतिष्ठित दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या आणि पुढील डिसेंबर मध्ये होणाऱ्या वार्षिक पोलीस कवायतीच्या वेळी पोलीसांना वाद्यवृंद साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला गेला. प्रतिष्ठित आणि व्यावसायिक दानशुरांप्रमाणेच सर्व सामान्य नागरिकांनी देखील त्यांच्या ऐपतीप्रमाणे पै-पैसा गोळा करून एक बऱ्यापैकी निधी जमा झाला. त्यातून ब्रास बँडचे वाद्य व साहित्य खरेदी करण्यात आले. अशा प्रकारे १९३६ च्या सुरवातीच्या मुंबई शहर पोलीस दलाला प्रथमच ब्रास बॅण्ड पथक उपलब्ध झाला.

भारताचे नवनिर्वाचित व्हाइसरॉय लॉर्ड लिनलियागो यांच्या हिंदुस्थानातील मुंबई येथील प्रथमच आगमनाच्या निमित्ताने त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ १७ एप्रिल १९३६ रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे एक पारंपरिक समारंभाचे एक विशेष आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने झालेल्या शानदार संचालनामध्येमिलिटरी वाद्यवृंदासोबत मुंबई पोलीसांच्या वाद्यवृदाचे शानदारपणे पदार्पण करण्यात आले. या मुंबई पोलीस वाद्यवृंदाचे प्रमुख बॅण्डमास्टर सी.आर.गार्डनर यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून आपल्या पदार्पणातच उपस्थितांची मने जिंकली.

अखेर तो दिवस उगवला. १९३६ च्या डिसेंबरमध्ये विशेष पोलीस संचालनात पोलीसांच्या वाद्यवृंदाने स्वतंत्रपणे वाद्य वाजवावीत, असे प्रतिष्ठित मंडळीने ठरविले होते. लॉर्ड ब्रेबॉर्न या हरहुन्नरी आणि खिलाडू वृत्तीच्या गव्हर्नर साहेबांनी अखेर मान्यता दिल्यानंतर १८ डिसेंबर १९३६ रोजी नायगांव मैदानावर पार पडलेल्या विशेष वार्षिक पोलीस संचालनामध्ये पोलीस वाद्यवृंदाने प्रथमच स्वतंत्रपणे वाद्य वाजवुन आपले वाद्य कौशल्य मुंबईकर जनतेसमोर सादर करून शाबासकीची थाप पाठीवर मारून घेतली. याच वेळी झालेल्या विशेष समारंभामध्ये गव्हर्नरलॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या हस्ते वाद्यवृन्दासाठी देणगी देणाऱ्या दानशूर दातृत्वांचा खास सत्कार करण्यात आला. त्यांनी ब्रॅन्ड प्रमुख गार्डनर आणि त्यांच्या सहकाऱ्याचेही तोंडभरून कौतुक केले. तत्कालिन जनताभिमुख पोलीस कमिशनर बॅरिस्टर डब्ल्यू.आर.जी.स्मिथ यांच्या विशेष प्रयत्नामुळेच ही पोलीस वाद्यवृंद पोलीस निर्मिती झाली. त्यामुळे त्यांनाही सर्वांनी धन्यवाद दिली. अशा प्रकारे बृहन्मुंबई पोलीस दलाला वाद्यवृंद पथक उपलब्ध झाले. म्हणुन १८ डिसेंबर हा दिवस मुंबई पोलीस दलामध्ये वाद्यवृंद दिवस म्हणुन साजरा केला जातो.

                                                                                             

बृहन्मुंबई पोलीस बॅण्डमास्टर्स ची यादी

अ. क्र. बॅण्डमास्टरचे नाव वर्ष
1 सी.आर.गार्डनर १९३६-१९४८
2 कॅर्वल्लो १९४९-१९५३
3 ब्रिटे १९५४-१९५७
4 फ्रँको १९५८-१९६७
5 विजय शिंदे १९६८-१९७४
6 मेहबूब खान १९७५-१९८१
7 सामुईल मोहिते १९८२-१९८४
8 जेरोमी रॉड्रीगुएस १९८५-२००२
9 रफिक रझ्झाक शेख २००३-२००५
10 सौदन भवानी सिंग २००६-२०१८
11 दत्तात्रय लक्ष्मण नाईकधुरे २०१८